तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ८८: सुख पाहतां जवापाडें
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥ नेलें रात्रीनें तें अर्धे । बाळपण जराव्याधें ॥२॥ तुका ह्मणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥
पाहायला गेले तर सुख जवाच्या दाण्याएवढे, आणि दुःख पर्वताएवढे. हे सतत लक्षात ठेव, धरून ठेव, आणि संतांचे वचन खरे मान. आयुष्याचा अर्धा भाग रात्र घेऊन जाते. उरलेला बालपणात, म्हातारपणात आणि रोगराईत जातो. तुकाराम महाराज म्हणतात, आणि पुढे, मूर्खाला जुंपावे तसे तुला घाण्याला जुंपतात.