तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ९४३: विठ्ठल गीतीं गावा
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं घ्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥ तो चि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धि । लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥ विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख । गोडावलें मुख तुका ह्मणे ॥४॥
विठ्ठलाला गीतांतून गावे, विठ्ठलाला चित्तात धरावे, आणि विटेवर उभा असलेला विठ्ठल डोळे भरून पाहावा. विठ्ठल अनाथांचा भाऊ आहे, कृपेचा सागर आहे. तो संसाराचे बंधन आणि यमाचा पाश तोडतो. शरण आलेल्यांना हाच विठ्ठल मुक्ती देतो, आणि संतांच्या संगतीत भेटतो तोही विठ्ठलच. विठ्ठल गुणांचा ठेवा आहे, सगळ्या सिद्धी म्हणजे विठ्ठलच, आणि विठ्ठलाच्या नामाने समाधी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचे नाम घेताच सुख झाले, आणि माझे मुख गोड झाले.