तुकारामांचे निवडक अभंग
अभंग ९८७: मऊ मेणाहून आह्मी विष्णुदास
मऊ मेणाहून आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥१॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठ्याळा चि गांठी देऊं माथां ॥२॥ मायबापाहूनि बहु मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥३॥ अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥४॥ तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥५॥
आम्ही विष्णूचे दास मेणापेक्षाही मऊ आहोत, आणि वज्रालाही भेदू इतके कठीणही आहोत. आम्ही मेलेले असूनही जिवंत आहोत, झोपलेले असूनही जागे आहोत. ज्याला जे हवे, ते ते आम्ही देऊ. माणूस भला असेल, तर त्याला आमच्या ढुंगणावरची लंगोटीही देऊ; आणि नाठाळ असेल, तर त्याच्या डोक्यात टेंगळेच देऊ. आम्ही आई-बापाहूनही मायाळू आहोत, आणि शत्रूहूनही अधिक घात करू. अमृत आमच्यापुढे काय गोड? आणि बिचारे विष आमच्यापुढे काय कडू? तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सगळेच गोड आहोत; ज्याची जशी हौस असेल, तशी ती आम्ही पुरी करतो.