कौटिलीय अर्थशास्त्र · Peace, War and the Circle of Kings
राजांचे मंडल
नेमिमेकान्तरान् राज्ञः कृत्वा चानन्तरानरान् । नाभिमात्मानमायच्छेत् नेता प्रकृतिमण्डले ॥
“एक राज्य सोडून पलीकडच्या राजांना चाकाची धाव बनवावे, लगतच्या शेजाऱ्यांना आरे बनवावे, आणि नेत्याने स्वतः या राजमंडळाचा तुंबा व्हावे.” अर्थशास्त्राच्या सहाव्या अधिकरणातला एक अध्याय राजांचे मंडल, म्हणजे तो प्रसिद्ध नकाशा, रेखाटतो. त्या अध्यायाच्या शेवटी हा श्लोक येतो. एका रांगेत असलेली राज्ये डोळ्यांसमोर आणा. मध्यभागी विजिगीषू असतो, म्हणजे विस्तार करू पाहणारा एक चांगला राजा. त्याच्या पुढे, तो ज्या दिशेने स्वारी करू पाहतो तिकडे, पाच राजे येतात. आधी त्याच्या सीमेवरचा शत्रू; मग विजिगीषूचा मित्र; मग शत्रूचा मित्र, मित्राचा मित्र, आणि शत्रूच्या मित्राचा मित्र. शत्रू बलवान असू शकतो, किंवा संकटात सापडलेला आणि हल्ल्याला खुला. त्याला कोणाचा आधार नसेल, तर त्याला उखडून टाकता येते; नाहीतर दुबळे करता येते. विजिगीषूच्या पाठीशी आणखी चार राजे असतात: दुसऱ्या सीमेवरचा पाठचा शत्रू, त्यापलीकडचा पाठचा मित्र, आणि या दोघांचा एकेक मित्र. दोघे या रांगेबाहेर उभे असतात. मध्यम राजाची सीमा विजिगीषू आणि त्याचा शत्रू या दोघांनाही भिडलेली असते; तो दोघांपैकी कोणालाही मदत करू शकतो, किंवा विरोध. उदासीन राजा या सगळ्यांच्या पलीकडे असतो, आणि फार बलवान; तो सगळ्यांचे पारडे फिरवू शकतो. एक विजिगीषू, पुढे पाच, मागे चार, आणि हे दोघे: असे बारा राजे. ग्रंथ प्रत्येकी तीन राजांची चार मंडळेही मोजतो, आणि त्यांची अंगेही. दोन शेजारी एकाच सीमेसाठी झगडतात; आणि तुमच्या शेजाऱ्यापलीकडच्या राजाचा प्रतिस्पर्धीही तोच असतो, जो तुमचा. असा शेजारी, तुमच्या बरोबरीचा आणि तुमच्यासारख्याच कुळातला, हा सहज शत्रू. दुसरा कृत्रिम शत्रू, परिस्थितीमुळे बनलेला: तो स्वतःहून वैर धरतो, किंवा इतरांना चिथावतो. मित्रांचेही तसेच: काही घराण्याचे जुने मित्र, तर काही गरजेपोटी नव्याने जोडलेले. बैलगाडीच्या चाकाचा मधला गोल भाग तुंबा, त्यातून बाहेर पसरलेल्या काड्या आरे, आणि सगळ्यांभोवतीची कडा धाव. श्लोक या रांगेचे असे चाक करतो, आणि राजाला त्याचा तुंबा. एक राज्य सोडून पलीकडे असलेले मित्र म्हणजे चाकाची धाव. मधले शेजारी प्रतिस्पर्धी असले, तरी ते आरे आहेत; राजा आणि त्याचे मित्र यांच्यामध्ये ते धरून ठेवलेले असतात. अधिकरण ६, अध्याय २.