कौटिलीय अर्थशास्त्र · Peace, War and the Circle of Kings
तारे काय करणार?
नक्षत्रमतिपृच्छन्तं बालमर्थोतिवर्तते । अर्थो ह्यर्थस्य नक्षत्रं किं करिष्यन्ति तारकाः ॥
“जो बालिश माणूस सारखा नक्षत्रांना विचारत बसतो, त्याच्या हातून धन निसटून जाते. धन हेच धनाचे नक्षत्र; तारे काय करणार?” अर्थशास्त्रातल्या सर्वाधिक उद्धृत श्लोकांपैकी हा एक. लाभाचा हिशेब मांडणारा एक अध्याय याच श्लोकाने संपतो. एखादी मोहीम करण्याजोगी आहे का, हे ठरवायला हा अध्याय राजाला मदत करतो. किती माणसे गमवावी लागतील, किती पैसा खर्च होईल, आणि हाती काय लागू शकेल, याचा तो हिशेब मांडतो. लाभांची वर्गवारीही केली आहे: लवकर मिळणारा की उशिरा; टिकणारा की लवकरच परत द्यावा लागणारा; प्रजेला आवडणारा की तिला नकोसा. मग लाभाच्या आड येणाऱ्या गोष्टींची यादी येते. काही उघड दोष आहेत: कामना, क्रोध, भित्रेपणा, हीनपणा, गर्व, दांभिकपणा, कंजूषपणा, दीनपणा, मत्सर आणि दुष्टपणा. तसेच भीती, अविश्वास, हातपाय न हलवणे, हाती असलेल्या गोष्टीची अवहेलना, आणि थंडी, ऊन, पाऊस सहन न होणे. काही गोष्टी तर गुण वाटाव्यात अशा आहेत: कोमलपणा, करुणा, लाज, आणि परलोकाची ओढ. यांची कारणे ग्रंथ देत नाही; पण यांतली प्रत्येक गोष्ट राजाला आवाक्यातल्या लाभापासून दूर ठेवू शकते. यादीतली शेवटची गोष्ट म्हणजे शुभ दिवसांवर आणि नक्षत्रांवर श्रद्धा. मग तो श्लोक येतो. ज्योतिष्याकडे शुभ मुहूर्ताची वाट पाहत बसणारा माणूस संधी हातची घालवतो. धन मिळवून देते ते कामाला लावलेले धनच; तारे नव्हेत. पुढचा श्लोक याहूनही कठोर सत्य सांगतो. निर्धन माणसांना शंभर प्रयत्न करूनही धन मिळत नाही. हत्तीने हत्ती पकडला जातो, तसे धनाने धन पकडले जाते. जुन्या काळी हत्ती पकडताना माणसाळलेल्या हत्तींच्या मदतीने रानटी हत्ती पकडून आणत. अधिकरण ९, अध्याय ४.