नीतिशतक
हत्तीला कमळाचे धागे
व्यालं बालमृणालतन्तुभिरसौ रोद्धुं समुज्जृम्भते छेत्तुं वज्रमणीञ्छिरीषकुसुमप्रान्तेन संनह्यते । माधुर्यं मधुबिन्दुना रचयितुं क्षाराम्बुधेरीहते नेतुं वाञ्छति यः खलान्पथि सतां सूक्तैः सुधास्यन्दिभिः ॥
भर्तृहरी एका माणसाचे चित्र रेखाटतात. अमृत ठिबकणाऱ्या सुभाषितांनी दुष्टांना सज्जनांच्या वाटेवर आणायची त्याला आशा आहे. “तो कोवळ्या कमळदेठाच्या धाग्यांनी रानटी हत्ती बांधायला निघाला आहे. शिरीषाच्या फुलाच्या टोकाने हिरे कापायची तयारी करतो आहे. मधाच्या एका थेंबाने खारा समुद्र गोड करू पाहतो आहे.” तिन्ही चित्रांत एकच दोष आहे: साधन सुंदर आहे, पण फारच दुबळे. कमळाचा देठ मोडला, की त्यातून बारीक रेशमासारखे धागे निघतात. शिरीषाचे फूल इतके नाजूक, की कोणत्याही कोमल गोष्टीसाठी कवी त्याचीच उपमा देतात. मधाचा थेंब समुद्रात नाहीसा होतो. अमृत गोड असते, पण गोडव्याला पकड नसते. दुष्ट चांगले शब्द ऐकतात आणि आपल्या वाटेने निघून जातात; पालथ्या घड्यावर पाणी. हा श्लोक चांगल्या उपदेशाच्या विरुद्ध नाही; सुंदर शब्द काय करू शकत नाहीत, एवढेच तो सांगतो. तेलंग हा प्राणी हत्ती मानतात; एका जुन्या टीकाकाराने तो साप मानला. नीतिशतक, श्लोक ६ (मूर्ख).