निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
तेलाविना तेवणारे दीप
अपेक्षन्ते न च स्नेहं न पात्रं न दशान्तरम् । सदा लोकहिते युक्ता रत्नदीपा इवोत्तमाः ॥
उत्तम माणसे रत्नदीपांसारखी, म्हणजे स्वतःच्या तेजाने उजळणाऱ्या रत्नांसारखी असतात. ती सदैव लोकहितात मग्न असतात; त्यांना तेल, पात्र किंवा नवी वात लागत नाही. यातील प्रत्येक शब्द दुहेरी आहे. स्नेह म्हणजे तेल आणि प्रेमही, पात्र म्हणजे भांडे आणि योग्य माणूसही, दशा म्हणजे वात आणि परिस्थितीही. सज्जन प्रेम, योग्य माणूस किंवा चांगले दिवस यांची वाट न पाहता भले करतात.