वैराग्यशतक
दोन्ही साधणारा एकटा शिव
एको रागिषु राजते प्रियतमादेहार्धहारी हरो नीरागेषु जनो विमुक्तललनासङ्गो न यस्मात्परः । दुर्वारस्मरबाणपन्नगविषव्याविद्धमुग्धो जनः शेषः कामविडम्बितान्न विषयान्भोक्तुं न मोक्तुं क्षमः ॥
“प्रेमिकांमध्ये एकटा हर शोभतो; त्याने आपल्या प्रियतमेला आपल्या देहाचा अर्धा भाग करून घेतले आहे. विरक्तांमध्येही स्त्रीसंगापासून मुक्त असलेल्या त्याच्याहून श्रेष्ठ कोणी नाही. बाकीची माणसे विषय भोगूही शकत नाहीत, आणि सोडूही शकत नाहीत. कोणालाही परतवता न येणारे मदनाचे बाण सापांसारखे त्यांना डसतात; विषाने ते गुंगून जातात, आणि कामवासना त्यांना मूर्ख बनवते.” हर म्हणजे शिव. त्याच्या एका रूपात, अर्धनारीश्वर रूपात, तो अर्धा पुरुष आणि अर्धा स्त्री आहे: एक बाजू शिवाची, दुसरी त्याची पत्नी पार्वतीची. आपल्या प्रियेच्या याहून जवळ कोणताच प्रियकर कधी गेला नाही. तरीही हाच शिव सगळ्या तपस्व्यांत श्रेष्ठ आहे; त्यानेच कामदेवाला जाळून भस्म केले. कामदेवाचे बाण फुलांचे असतात, असे म्हणतात. इथे ते साप आहेत, दंशात विष असलेले. ते लागले, की सामान्य माणसे ना इकडची राहतात, ना तिकडची. दोन्ही साधते ते फक्त एका देवालाच. वैराग्यशतक, श्लोक १७ (विषयांचा मोह).