प्रमुख उपनिषदे · छान्दोग्योपनिषद्
पाणकावळ्याचा पाद
मद्गुष्टे पादं वक्तेति स ह श्वोभूते गा अभिप्रस्थापयांचकार ता यत्राभि सायं बभूवुस्तत्राग्निमुपसमाधाय गा उपरुध्य समिधमाधाय पश्चादग्नेः प्राङुपोपविवेश ॥ १ ॥ तं मद्गुरुपनिपत्याभ्युवाद सत्यकाम३ इति भगव इति ह प्रतिशुश्राव ॥ २ ॥ ब्रह्मणः सोम्य ते पादं ब्रवाणीति ब्रवीतु मे भगवानिति तस्मै होवाच प्राणः कला चक्षुः कला श्रोत्रं कला मनः कलैष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मण आयतनवान्नाम ॥ ३ ॥ स यै एतमेवं विद्वांश्चतुष्कलं पादं ब्रह्मण आयतनवानित्युपास्त आयतनवानस्मिंल्लोके भवत्यायतनवतो ह लोकाञ्जयति य एतमेवं विद्वांश्चतुष्कलं पादं ब्रह्मण आयतनवानित्युपास्ते ॥ ४ ॥
“शेवटचा पाद तुला मद्गु सांगेल,” हंस म्हणाला. दुसऱ्या दिवशी सत्यकाम कळप हाकत पुढे गेला, आणि आधीसारखाच संध्याकाळी मुक्काम केला. तो अग्नीपाशी बसला असताना एक मद्गु, म्हणजे मासे पकडायला पाण्यात सूर मारणारा पाणकावळा, उडत त्याच्यापाशी आला. “सत्यकामा!” “जी, भगवन्?” “सौम्या, मी तुला ब्रह्मतत्त्वाचा एक पाद सांगतो.” “भगवन्, सांगावे.” “प्राण एक भाग, डोळा एक भाग, कान एक भाग, मन एक भाग. चार भागांच्या या पादाचे नाव आयतनवान, आधार असलेला. जो असे त्याचे ध्यान करतो, त्याला या जगात आधार मिळतो, पाय रोवायला जागा मिळते; आणि त्यानंतर राहायला ऐसपैस जागा असलेली जगे मिळतात.” शंकराचार्य म्हणतात, हा पक्षी प्राणाचे प्रतीक आहे, कारण दोघांचेही नाते पाण्याशी आहे. आधार म्हणजे मन: इंद्रिये जे जे आणतात, ते सारे तिथेच गोळा होते.